शरद पवार पर्व..

 शरद पवार यांना १२ डिसेंबर रोजी वयाची ७० वर्षे पूर्ण होत आहेत. येती काही वर्षे ते राजकारणात सक्रिय राहू शकतील. समाजकारणात तर त्यांना रस कायमच असतो.


त्यानी वारंवार दाखवून दिले आहे. त्यांनी त्या दृष्टीने अनेक पुरोगामी पावले उचलली आहेत. मग ते महाराष्ट्राच्या प्रमुखपदी असोत किंवा राज्याच्या राजकारणात पाय रोवत असोत.


पवार नेमके काय करणार आहेत हा नेहमीच कुतुहलाचा विषय असतो. आता आयुष्याच्या आणि राजकारणाच्या या टप्प्यावर त्यांचा प्रवास काणत्या दिशेने होईल?

महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात शरद पवार हे नाव गाजायला लागले, ते १९७८च्या मध्यापासून. काँग्रेसमध्ये बंड घडवून आणत, जनता पक्षाच्या मदतीने त्यांनी सरकार स्थापले आणि देशातले ते सर्वात तरुण मुख्यमंत्री झाले. त्यांनी असे करताना, तेव्हाचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला असे म्हटले गेले. परंतु यात काही तथ्य नाही. कारण हा न्याय लावायचा झाला तर अनेक राजकीय नेते मनात असे दोन चार खंजीर घेऊन फिरत असतात असे म्हणावे लागेल आणि यापैकी अनेक संधी मिळताच खंजीराचा वापर करत असतात.


दिल्लीविरुद्ध पुकारलेले पवारांचे हे बंड अपयशी ठरले, कारण १९८० साली इंदिरा गांधी पुन्हा प्रचंड बहुमताने सत्तेत आल्या आणि पवारांचे सरकार त्यांनी बरखास्त केले. पवारांचा पक्ष त्यानंतर झालेल्या निवडणुकीत विरोधी पक्षात गेला. विरोधी पक्षात राहून राजकारण करणे कठीण असते याची कल्पना असलेल्या पवारांनी राजीव गांधी यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे काँग्रेस पक्षात म्हणजे मुख्य प्रवाहात येण्याचा मार्ग निमूटपणे पत्करला. त्याला स्वगृही परतणे असेही म्हटले गेले.
दरम्यान, पवारांची ताकद आणि उपद्रव क्षमता महाराष्ट्रात इतकी वाढली होती की, ते दुस-यांदा मुख्यमंत्री झाले. पवार यांनी आता पुरोगामी पावले टाकण्यास सुरुवात केली. सहकार क्षेत्रात महिला, मागासवर्गीयांना स्थान मिळावे यासाठी कायद्यात बदल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. ऊस शेतक-यांनी पाणी कमी वापरावे असे ते सांगू लागले, परंतु शंकरराव चव्हाण यांनी शेतीला बारमाही पाणी देणे बंद केले होते ते धोरण सुरू राहिले नाही हेही खरे. दरम्यान पवारांनी मुंबई हे आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र बनवण्याची भाषा सुरू केली. नव्या औद्योगिक धोरणात मुंबईत प्रदूषण करणा-या उद्योगांना स्थान नाही ही भूमिका मांडली जाऊ लागली. मुंबईतून कापड गिरण्या बंद होणे, रासायनिक कारखाने मुंबईबाहेर जाणे ही प्रक्रिया तेव्हा सुरू झाली. आजची मुंबई तेव्हाच बांधणे सुरू झाले. मुंबईत सेवा उद्योगांची वाढ होणे,
टॉवर्स उभे राहणे याचीही हीच सुरुवात पवारांच्या नेतृत्त्वाखाली १९९०च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जेमतेम सत्ता राखली. रामदास आठवले यांच्या रिपब्लीकन पक्षाशी केलेली हातमिळवणी फायद्याची ठरली. पवारांना राज्यात कोणत्या समाजघटकाची ताकद वाढते आहे याचा अंदाज अचूक येतो, हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले. आपणच पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी त्यांनी काँग्रेसला जेमतेम यश मिळेल अशी व्यूहरचना केली, अशी लोणकढी त्यांच्या भाटांनी पसरवली आणि पवारांशिवाय महाराष्ट्रात काही चालत नाही असे दाखवण्याचा प्रयत्न केला.

हा काळ पवारांना फार त्रासाचा गेला. दिल्लीत राजीव गांधी यांच्या हत्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत त्यांनी पंतप्रधान होण्याचा प्रयत्न केला. तो सपशेल फसला. पण सुरेश कलमाडींसारख्या अतिउत्साही पाठिराख्यांनी तेच पंतप्रधान होणार असे पसरवले. ते पी. व्ही. नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये संरक्षणमंत्री झाले. यापुढे आपण महाराष्ट्रात परत जाणार नाही असे सांगण्यास त्यांनी सुरुवात केली, पण बेरकी रावांनी मुंबईतील दंगलींच्या पार्श्वभूमीवर त्यांना मुख्यमंत्री म्हणून परत धाडले. पवारांनी ही परिस्थिती विलक्षण तडफेने हाताळली. मुंबईत सर्व काही सुरळीत आहे असा मेसेज ते जगाला देण्यात यशस्वी झाले. पण विरोधी पक्षनेते गोपीनाथ मुंडे यांनी त्यांचे संबंध दाऊद इब्राहीमशी जोडणारे आरोप केले. त्यांना काँग्रेसमधीलच नेत्यांनी रसद पुरवली. शिवाय अण्णा हजारे, खैरनार, पोलीस अधिकारी उल्हास जोशी यांनीही यात भाग घेतला. सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना त्यांनीही पवारांवर, पप्पू कलानी याला अटक झाल्यावर सांभाळून घ्या, असा आडून मेसेज दिला, असे सुचित केले. पवारांची प्रतिमा पूर्णपणे मलीन करण्याची मोहीमच सुरू होती..
याच भर पडली ती वादग्रस्त एन्रॉन प्रकल्पाची. महाराष्ट्राला मोठया प्रमाणात वीज लागणार हे त्यांचे गणित अचूक होते. पण विजेची गरज भागवण्यासाठी त्यांनी निवडलेली एन्रॉन ही कंपनी संशयास्पद ठरली. कंपनीचे व्यवहारही फार चांगले नाहीत असे दिसू लागले. कंपनीने घातलेल्या अटी महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या खड्यात घालणा-या आहेत, असे जाणवू लागले. पवारांना अडचणीत आणणारा हा प्रकल्प ठरला.

याच मुख्यमंत्रीपदाच्या काळात पवारांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेचे स्वप्न पाहिले. त्याची आखणीही याच काळात सुरू झाली. पण इतक्या प्रचंड प्रकल्पासाठी लागणरा निधी कसा उभारायचा हे त्यांना सुचले नाही आणि नितीन गडकरी यांनी खासगी भांडवल उभारणी करून आणि एमएसआरडीसी ही स्वतंत्र कंपनी स्थापन करून हे आव्हान स्वीकारले आणि नाव कमावले.
याच काळात त्यांनी महिला धोरण जाहीर केले. राज्यातील महिलांना अनेक फायदे देणारे हे धोरण नंतर इतर अनेक राज्यांनी स्वीकारले. पण हा समारंभ मुंबईतील आलिशान नेहरू सेंटरमध्ये करताना गावातून आलेल्या महिला बाहेरच राहिल्या आणि उच्चभ्रू महिलांनी या समारंभात मिरवून घेतले. पवारांनी, राज्यातील फलोत्पादनाला चालना देणारे धोरणही जाहीर केले. द्राक्षे, बोरे, डाळींबे इत्यादी फळांचे उत्पादन महाराष्ट्रात वाढले ते या नंतरच... द्राक्षपासून वाईन बनवून शेतकरी अधिक पैसे मिळवू शकतो हेही पवारांनी सांगितले आणि ज्यांनी तसे शास्त्रशुद्ध पद्धतीने केले त्यांना पैसाही मिळाला. याचा फायदा छोट्या शेतकऱ्यांनाही झाला. पवारांनी शेती आणि दूध उत्पादन या क्षेत्रात बारामतीत केलेले प्रयोग आजही वाखाणले जातात आणि सर्वांनी त्यांचे अनुकरण करावे असे ते आहेत. किंबहुना पवार हे शेती, उद्योग यात रमतात. तो त्यांचा पिंड आहे.
हा काळ पवारांची परीक्षा बघणारा ठरला. मुंडेंच्या आरोपांनी ग्रासलेल्या पवारांपुढे लातूर भूकंपाचे आव्हान उभे ठाकले. अर्थात त्यांनी तेही समर्थपणे हाताळले.

१९९५च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा युतीने सरकार स्थापण्याइतके यश मिळवले ते दंगली, बाँबस्फोट, महाआरती, पवारांवरील आरोप अशा अनेक बाबींमुळे... युती जिंकली आणि काँग्रेस हरली. युतीचे सरकार यावे अशी पवारांचीच इच्छा होती अशी पुडी मग पवार समर्थकांनी सोडली.

यानंतर पवार केंद्रीय राजकारणात स्थिरावले, ते पंतप्रधान बनण्याची आकांक्षा बाळगत. राष्ट्रीय पातळीवर आघाडीचे दिवस येतील हा त्यांचा अंदाज होता. त्यामुळे सोनिया गांधी या परदेशी आहेत अशी भूमिका घेत त्यांनी काँग्रेस सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. पण नेमके यानंतर काँग्रेसचे ग्रह उच्चीचे ठरले. सोनिया गांधींच्या नेतृत्त्वाखाली लागोपाठ दोन लोकसभा निवडणुका पक्षाने जिंकल्या. पवारांनी १९८५साली काँग्रेस पक्षात पुन्हा प्रवेश केला त्यानंतर देशात काँग्रेसची घसरगुंडी सुरू झाली आणि आघाडीचे राजकारण यशस्वी ठरत गेले. व्ही. पी. सिंह, चंद्रेशखर, देवेगौडा, इंदरकुमार गुजराल असे पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर आरूढ झाले. तेव्हा पवार विरोधी पक्षात असते तर नक्कीच अधिक चांगले, यशस्वी नेतृत्व देशाला देऊ शकले असते.
पवार हे महाराष्ट्रात अत्यंत लोकप्रिय आहेत, असे म्हटले जाते. परंतु ज्या वेळी ते काँग्रेसबाहेर जाऊन महाराष्ट्रात लढले तेव्हा त्यांची ताकद स्पष्ट झाली. १९८० आणि १९८५च्या तसेच १९९९, २००४ आणि २००९ या पाचही विधानसभा निवडणुकांचा निकाल बघितला तर पवारांची ताकद ५० ते ८० आमदार इतकीच राहिली आहे. स्वबळावर सरकार स्थापन करण्याची ताकद त्यांच्यात नाही. आता तर पवारांचे अनुयायीही त्यांचे फारसे ऐकत नसावेत असे दिसते. ज्या पवारांनी राज्य विजेच्या आघाडीवर स्वयंपूर्ण व्हावे म्हणून एन्रॉनची तरफदारी केली त्याच पवारांचे लाडके दिलीप वळसे पाटील आणि अजित पवार या खात्याचे मंत्री असूनही आज ग्रामीण भाग दहा ते बारा तास अंधारात असतो. पवारांचे महिला धोरण आणखी पुढे नेण्यात त्यांच्या पक्षाचे नेते फार प्रयत्न करताना दिसत नाहीत.
राजकीय अपरिहार्यता म्हणून पवारांना काही निर्णय घ्यावे लागतात असे म्हणतात. पण जितेंद्र आव्हाड यांना राज्यपालांच्या यादीतून विधानपरिषदेवर पाठवण्याइतकी अगतिकता पवारांमध्ये यावी?ज्या पवारांनी, मुस्लीम समाजात प्रगती घडावी म्हणून लढणा-या सत्यशोधक समाजाचे हमीद दलवाई यांना सहाय्य केले. त्यांच्या आजारापणात त्यांना आपल्या बंगल्यावर ठेवून त्यांना सर्व वैद्यकीय मदत दिली तेच पवार दोन वर्षांपूर्वी मुसलमानांना अधिक आरक्षण मिळावे, त्यांच्यावर अन्याय होतो अशी मुल्ला मौलवींना शोभणारी भाषा बोलू लागले.
पवार यांचे विचार नेहमीच पुरोगामी ठरले. पवार यांनी अनेकदा, स्वत:चे नाव येऊ न देता अशीच मदत इतरांना केली. जयंत नारळीकरांचे आकाशाशी जडले नाते या खगोलशास्त्रविषयक अप्रतिम पुस्तकाच्या ५०० प्रति मुंबई, पुणे शहराबाहेरील गरीब शाळातून वाटल्या त्या अशाच निनावी पद्धतीने. ग्रामीण भागांत काम करणा-या कार्यकर्त्यांना, संस्थांना त्यांचा नेहमीच आधार वाटतो. साहित्य, कलाकार यांनाही त्यांनी अशीच मदत केली आहे.पवार यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी विविध क्षेत्रांतील जोडलेली माणसे. वैद्यकशास्त्र, लेखन, अभिनय, चित्रनाट्य, समाजकारण, उद्योग अशा क्षेत्रांतील अनेकजण पवारांचे स्नेही आहेत. या सर्वांना पवारांनी मदतही केली आहे. पवार हे उत्तम वाचक आहेत. बारामती येथे उभारलेल्या शिक्षणसंस्थेत त्यांनी खरेदी केलेली, वाचलेली पुस्तके, ग्रंथ वाचकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी ठेवलेले आहेत. त्यावरून एक नजर टाकली तरी पवारांना किती विविध विषयांत रस आहे हे जाणवते. राजकारणात असलो तरी मित्र सर्वच क्षेत्रांतील असावेत हा धडा बहुधा ते आपले गुरू यशवंतराव चव्हाण यांच्याकडून शिकले असावेत. पण निसर्गकवी ना. धो. महानोर यांनी त्यांना 'जाणता राजा' म्हणून फारच अडचणीत आणले. महाराष्ट्रात कोणालाही आपली तुलना थेट शिवाजी महाराजांशी व्हावी हे आवडणारे नाही. पवारांना तर अगदीच नाही.
पवार यांच्या नावावर, त्यांचे चाहते बरेच काही खपवत असतात. जणू काही महाराष्ट्राच्या राजकाणात घडणारी प्रत्येक बाब ते घडवतात. याचा पवारांना नक्कीच त्रास होत असणार. पण अशी बांडगुळे मोठ्या माणसांना बाळगावी लागतातच किंवा ती आपोआप उगवत असतात. पवारांना सतत वादात रहायला आवडत असावे. मग ते बिल्डर्सशी संबंध असलचा आरोप असो किंवा दाऊदशी संबंध असल्याचा किंवा आयपीएलमधील घोटाळयांबाबत. अर्थात आता बिल्डर्सशी राजकारण्यांचे संबंध इतके गहिरे आहेत की अशा आरोपांचे कोणास काही वाटत नाही. पण दोन दशकांपूर्वी बिल्डर्सशी राजकारण्याचे संबंध हा चर्चेचा विषय बने. काळाचा माहिमा दुसरे काय!

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाजयुमो कल्याण जिल्हा सरचिटणीस पदी कुलदीप चोप्रा याची वर्णी

मुली स्वतःहून संबंध ठेवतात अन् ‘ब्रेकअप’नंतर बलात्काराच्या तक्रारी करतात; महिला आयोगाच्या अध्यक्षांचं विधान

बुलेट ट्रेनचा प्रस्ताव मार्गी लागणार!