अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाकडून डोनाल्ड ट्रम्प यांचा अपेक्षाभंग
अध्यक्षीय निवडणुकीत अटीतटीच्या राज्यांमधील निवडणूक निकालास आव्हान देणारी ट्रम्प यांच्या वतीने दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे ट्रम्प यांची निवडणुकीतील निकालावरची न्यायालयीन लढाई संपुष्टात आली आहे. निकालावर ट्रम्प यांनी म्हटले आहे, की सर्वोच्च न्यायालयाने आमचा अपेक्षाभंग केला, त्यांना काही विचार किंवा बुद्धी नाही, त्यांच्यात धैर्यही नाही. ही कायद्याची अवमानना आहे.
टेक्सासचे अॅटर्नी जनरल केन पॅक्स्टन यांनी ट्रम्प यांच्या वतीने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. याचिकेत जॉर्जिया, मिशिगन, पेनसिल्वेनिया तसेच विस्कॉन्सिन या राज्यांतील निकालांना आव्हान देण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सॅम्युअल अॅलिटो व न्या. क्लॅरेन्स थॉमस यांनी सांगितले, की न्यायालय टेक्सासच्या याचिकेतील दावा मान्य करू शकत नाही.
या याचिकेला रिपब्लिकन पक्षाच्या १२६ सदस्यांचा पाठिंबा होता. टेक्सासने दाखल केलेल्या आव्हान याचिकेत कुठलाही दखलपात्र मुद्दा नसून इतर राज्यांनी निवडणूक कशा पद्धतीने घेतली याबाबत त्यांचा दावा न्यायिक निकषांवर टिकणारा नाही. त्यामुळे ही याचिका व त्याच्याशी संबंधित इतर सर्व याचिका फेटाळण्यात येत आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. ट्रम्प यांना हा मोठा धक्का आहे.